Share News

 राडी शिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ!
३० ते ३५ वर्षीय इसमाची ओळख अद्याप अनोळखी; राडी शिवार हादरले
अंबाजोगाई : अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे राडी शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी ही घटना समोर आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राडी शिवारात अचानक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, या घटनेने राडी शिवार हादरून गेले आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या अंगावर प्रथमदर्शनी कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मृतदेह SRTR रुग्णालय, अंबाजोगाई येथील शवागृहात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ६९/२०२६, कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील मिसिंग व्यक्तींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात ३० ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुष बेपत्ता असल्याची नोंद असल्यास त्याची माहिती पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेबाबत गुन्हेगारी प्रकार प्रथमदर्शनी स्पष्ट झालेला नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्यासह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
या मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिसरातील एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
राडी शिवारात सापडलेल्या या अनोळखी मृतदेहाची ओळख कधी पटणार? मृत्यूचे नेमके कारण काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author