Share News

२२ वर्षांपासून गोरगरीब, सर्वसामान्य आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक बळ; कोलंबो येथे ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट सूक्ष्म वित्त कंपनी’ म्हणून गौरव

**अंबाजोगाई / प्रतिनिधी**
गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणाऱ्या अंबाजोगाई येथील अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या २२ वर्षांच्या कार्यकाळात विश्वास आणि सहकार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यांच्याकडे आर्थिक पत आणि सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्यांनाच अनेकदा प्राधान्य मिळते; मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देऊन त्यांची पत आणि प्रतिष्ठा वाढविण्याचे काम अलखैर पतसंस्थेने केले आहे. अनेकांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणारी ही संस्था केवळ पतसंस्था नसून, माणसाला आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणारी एक सामाजिक ताकद असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच कार्याची दखल घेत इस्लामिक फायनान्स फोरम ऑफ साऊथ एशिया (IFFSA) यांच्या वतीने श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत अल खैर नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२५-२०२६ साठी ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट सूक्ष्म वित्त कंपनी’ या श्रेणीत सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे अंबाजोगाईच्या सहकार क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

**कोलंबो येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला**

श्रीलंकेतील कोलंबो येथील शांग्री-ला हॉटेलमध्ये २० ऑक्टोबर २०२६ रोजी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या परिषदेला अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारूक, उपाध्यक्ष मोहम्मद मुजम्मील खतीब आणि सचिव शेख रिजवान उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वतीने हा मानाचा सुवर्ण पुरस्कार स्वीकारला.

इस्लामिक फायनान्स फोरम ऑफ साऊथ एशिया (IFFSA) यांच्या वतीने आयोजित या परिषदेत विविध देशांतील इस्लामिक वित्त आणि सूक्ष्म वित्त क्षेत्रात कार्यरत संस्थांचा सहभाग होता. वित्तीय क्षेत्रातील संस्थांची कामगिरी, योगदान आणि आर्थिक समावेशनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली.

**तीन वर्षांच्या आर्थिक अहवालांचे मूल्यांकन**

या पुरस्कारासाठी विविध संस्थांकडून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची निवड करण्यात आली. पुरस्कार निवड प्रक्रियेत स्वतंत्र परीक्षक समितीने अर्जदार संस्थांच्या मागील तीन वर्षांच्या आर्थिक अहवालांचे सखोल विश्लेषण केले. तसेच संस्थांचे कामकाज, आर्थिक सेवा, संस्थात्मक क्षमता आणि सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाशी संबंधित कागदपत्रांचे मूल्यांकन करण्यात आले. या स्पर्धात्मक प्रक्रियेत अल खैर पतसंस्थेची सुवर्ण पुरस्कारासाठी निवड झाली.

संस्थेची सातत्यपूर्ण कामगिरी, व्याजमुक्त सूक्ष्म वित्तीय सेवांप्रती असलेली बांधिलकी आणि आर्थिक समावेशनासाठी सुरू असलेले प्रयत्न या यशामागील महत्त्वाचे पैलू आहेत.

**सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणारी संस्था**

गेल्या २२ वर्षांपासून अलखैर नागरी सहकारी पतसंस्था अंबाजोगाई शहरात कार्यरत आहे. संस्थेने स्थापनेपासूनच गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य दिले आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेकदा सामान्य माणसाची स्वप्ने अपूर्ण राहतात. अशा वेळी त्याला आर्थिक आधार मिळावा, स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, या दृष्टिकोनातून संस्थेने काम केले आहे.

समाजात अनेक वित्तीय संस्था कार्यरत असल्या, तरी आर्थिक पत किंवा सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या व्यक्तींना आर्थिक आधार देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे कार्य अल खैर पतसंस्थेने केले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात अनेकांना त्यांच्या व्यवसायाच्या उभारणीसाठी, प्रगतीसाठी आणि वैयक्तिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आर्थिक बळ मिळाले आहे. त्यामुळे संस्थेने आर्थिक व्यवहारांपलीकडे जाऊन सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

**व्याजमुक्त वित्तीय सेवा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा ध्यास**

अलखैर नागरी सहकारी पतसंस्था सहकारी मॉडेलच्या माध्यमातून नैतिक आणि व्याजमुक्त वित्तीय सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू घटकांना वित्तीय व्यवस्थेशी जोडणे, सभासदांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा विस्तार करणे, ही संस्थेच्या कार्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक नागरिकांपर्यंत व्याजमुक्त वित्तीय सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

**सहूलत मायक्रोफायनान्स सोसायटीच्या सहकार्याची दखल**

संस्थेच्या प्रगतीमध्ये सहूलत मायक्रोफायनान्स सोसायटी, नवी दिल्ली यांचे मार्गदर्शन, सल्ला आणि सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या विकासात योगदान दिल्याबद्दल सहूलत मायक्रोफायनान्स सोसायटीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

या यशामध्ये योगदान देणारे संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी आणि हितचिंतक यांचेही संस्थेने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. हा सन्मान सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा, समर्पणाचा आणि परिश्रमांचा गौरव असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली.

**अंबाजोगाईच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद यश**

२२ वर्षांच्या प्रवासात सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देत विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला मिळालेला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार हा संस्थेच्या कार्याची दखल घेणारा महत्त्वपूर्ण सन्मान आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तींना आधार देणे, छोट्या व्यावसायिकांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे आणि सामान्य माणसाचा आत्मसन्मान जपणे, या उद्देशाने सुरू असलेल्या कार्याला या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. अंबाजोगाईच्या सहकार क्षेत्रासाठी हे यश निश्चितच अभिमानास्पद ठरले आहे.

About The Author