टाईप रायटिंग परीक्षेत यशराज औताडे सर्वप्रथम
94.5% गुण घेऊन अंबाजोगाईतून प्रथम क्रमांक; एकाच वेळी चार परीक्षा देत मिळविले घवघवीत यश
अंबाजोगाई : येथील यशराज नागेश औताडे यांनी टाईप रायटिंग परीक्षेत 94.5% गुण मिळवून अंबाजोगाईतून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी एकाच वेळी मराठी ३०, मराठी ४०, इंग्रजी ३० आणि इंग्रजी ४० अशा चारही टाईप रायटिंग परीक्षा दिल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केली.
यशराज औताडे हे ‘योगेश्वर दर्शन न्यूज चैनल’चे संपादक तथा पत्रकार नागेश औताडे यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, महाविद्यालयीन शिक्षणासोबतच टाईप रायटिंगचा सराव करत त्यांनी हे यश संपादन केले आहे.
सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि अचूक टायपिंगच्या जोरावर यशराज यांनी 94.5% गुणांची उत्कृष्ट कामगिरी करत अंबाजोगाईतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. एकाच वेळी चार परीक्षा देऊन मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
यशराज यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, अंबाजोगाई पत्रकार संघ आणि गोल्डन आरोग्य फॅमिली यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणासोबत कौशल्यविकासावर भर देत यशराज यांनी मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.





