Share News

क्रिकेट खेळाडूंना शिकवते जीवन कसे जगायचे : डॉ. राजेश इंगोले

स्व. प्रकाशचंद सुरजमलजी मूथा यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

अंबाजोगाई : स्व. प्रकाशचंद सुरजमलजी मूथा यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. राजेश इंगोले यांनी खेळाडूंशी संवाद साधत क्रिकेटमधून मिळणाऱ्या जीवनमूल्यांवर मार्गदर्शन केले.

खेळाडूंशी संवाद साधताना डॉ. राजेश इंगोले यांनी “क्रिकेट आपल्याला काय शिकवते?” असा प्रश्न उपस्थित केला. यावर खेळाडूंनी शिस्त, संयम, संघभावना, मेहनत, आत्मविश्वास तसेच अपयशातून पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा मिळते, अशी सकारात्मक उत्तरे दिली.

यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. इंगोले म्हणाले, “क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर जीवन कसे जगायचे याची शिकवण देणारे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूचा सामना केला जातो, त्याच पद्धतीने जीवनातील अडचणींचाही धैर्याने सामना केला पाहिजे.”
यावेळी दैनिक मराठवाडासाथीचे पत्रकार लाटकर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कराड यांनी आपल्या भाषणातून, “मुलांनी क्रिकेट केवळ खेळ म्हणून न खेळता, त्यातून जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकाव्यात,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निलेश मूथा यांनी स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. ग्रामीण व स्थानिक भागातील युवा खेळाडूंना आपल्या क्रिकेट कौशल्याला वाव देण्यासाठी तसेच स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

यंदाच्या स्पर्धेत एकूण १० संघांचा सहभाग असून, २० षटकांचे दिवस-रात्र सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेमुळे परिसरातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांचा निलेश मूथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. राजेश इंगोले, पत्रकार लाटकर, ॲड. फड, ॲड. शेप, कराड, निलेश मूथा यांच्यासह खेळाडू, पालक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या निमित्ताने अंबाजोगाई परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

About The Author