*फार्मसी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी. फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन अभिमानाने, प्रेरणादायी वातावरणात आणि विद्यानिष्ठ भावनेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्राचार्य डॉ. संतोष तरके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत गायले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष तरके यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचा ऐतिहासिक मागोवा घेतला आणि या संस्थेने मराठवाड्यात घडवलेल्या सामाजिक परिवर्तनावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतर लढ्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांना शिक्षण, समता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव बाळगण्याचे आवाहन केले. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवडक वक्त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासून नामांतर लढ्यापर्यंतचा इतिहास उलगडून दाखवला. त्यांनी या लढ्याचे नेतृत्व, सामाजिक संदर्भ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव अधोरेखित केला आणि विद्यार्थ्यांना जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक होण्याचे संदेश दिले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मंदार चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. संतोष तरके यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अभिनंदनासह आपले विचार मांडताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेमाची भावना बळावते. विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरतो, ज्यातून ते समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतात.” या वेळी बी. फार्मसी महाविद्यालयातील डॉ. गितांजली चव्हाण, काव्या रेड्डी, अश्विनी घोळकर, मंजुषा करेप्पा, अमर कावरे, विशाल साखरे, इम्रान सय्यद, मामूण कुरेशी, गणेश गिरी, ज्योती मुरकुटे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
