महिलांचा सन्मान म्हणजे समाजाची ओळख : सालेहा जिलानी शेख
महिलांच्या मूलभूत प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या- सालेहा जिलानी शेख यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली तत्काळ दखल
बीड (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान म्हणजे समाजाची ओळख
हे भान ठेवत समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांनी महिलांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न प्रामाणिकपणे मांडत जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी माहिती देत निवेदन दिले.
या निवेदनाची माहिती घेत तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले की, ‘ ज्या ठिकाणी महिलांसाठी शौचालये उपलब्ध नाहीत, तिथे तात्काळ बांधकाम सुरू करावे, आणि जी असलेली शौचालये निकामी स्थितीत आहेत, ती सुसज्ज करून कार्यान्वित करावीत’.
एवढेच नव्हे तर संबंधित यंत्रणांनी कामाचा अहवाल वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असा स्पष्ट निर्देशही दिला आहे.
या निर्णयाने महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, सालेहा जिलानी शेख यांनी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानत त्यांनी
समाजवादी पार्टीचे तसेच या लढ्याला बळ देणारे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. शिवाजी कांबळे, अन्य पदाधिकारी आणि या विषयाला वाचा फोडणाऱ्या पत्रकार बांधवांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.
हा मुद्दा फक्त माझा नाही, तो प्रत्येक स्त्रीचा आहे – आणि आता त्यावर कृती सुरू झाली आहे, असे शब्द ठामपणे उच्चारून त्यांनी महिलांच्या हक्कासाठी सुरू केलेली ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
