कला व कलाकार ही तर समाजाची ऊर्जा स्थाने: डॉ. राजेश इंगोले :
ध्वनी,चित्र, रंजन या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे अंबाजोगाईकरांना घडले लोककलेचे दर्शन*
*कला व कलाकार ही तर समाजाची ऊर्जास्थाने – डॉ.राजेश इंगोले.*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कला व कलाकार ही त्या त्या देशाची, समाजाची ऊर्जास्थाने असतात. ज्यामुळे लोकांमध्ये प्रबोधन आणि क्रांतीचे विचार रूजविले जातात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले. लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित वेव्ह २०२५ या कार्यक्रमांतर्गत आयोजित संगीत सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून अंबाजोगाईचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड यांच्यासह तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, अभय जोशी व भीमाशंकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते कलादेवतेचे प्रतिमापूजन व दीप प्रज्ज्वलाने करण्यात आली. पुढे बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, भारत सरकार द्वारा आयोजित हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार द्वारे प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. व महाराष्ट्रातील लोककलाकारांना एक सशक्त व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे अभिनंदन केले. कलेचा वारसा हा ऐतिहासिक असतो आणि विविध कलाकार इतिहासामध्ये आपली नोंद कलेच्या माध्यमातून करतात आणि आजरा अमर होतात. कला ही त्या कलाकाराला माणूस म्हणून समृद्ध करत असते आणि त्यामुळे कलाकार हे आपल्या आयुष्यात सदैव समाधानी, सुखी आणि आनंदी असतात असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त करत असे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र सरकार तर्फे वारंवार अंबाजोगाई मध्ये घेण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मिलिंद गायकवाड यांनी शासन हे महाराष्ट्रातील कला व कलाकार यांना जागतिक पातळीवर घेऊन जात आहे असे मत व्यक्त केले. यानंतर झालेल्या चर्चासत्रात निषाद म्युझिक कंपनीचे प्रकाश बोरगावकर यांनी संगीत ही मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालेली आहे आणि भारताकडे यासाठी लागणारी सर्व संसाधने आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संगीताचा धबधबा आज ही कायम आहे. येथील तरूणांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या जीवनाचे करिअर संगीत क्षेत्रात घडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रख्यात शाहीर तुकाराम सुवर्णकार यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याने झाली. यावेळी २०२५ ची ध्वनिचित्रफीत सगळ्यांना दाखवून यावर चर्चासत्र संपन्न झाले. या कार्यक्रमात पोवाडा जागरण गोंधळ लोकगीते स्थानिक कलाकारांची चर्मवाद्यांवर जुगलबंदी महाराष्ट्र गीत स्थानिक लोककला लोकधारा शाहिरी गीते जनप्रबोधनपर गीते यांचे प्रभावी सादरीकरण झाले. यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या गायन नृत्य गोंधळी कला यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक समन्वयक प्रवीण जोगदंड यांनी तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश म्हेत्रजकर, राजकुमार गायके, महेश वेदपाठक, आकाश चौरे, मंगेश भिसे, डॉ.प्रवीण केदार यांनी परिश्रम घेतले.
