
*कलेचा दर्जा घसरत चाललाय….फापट पसारा पसरत चाललाय…!!!*
मागे वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती…..पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या कोणत्याच संघास परीक्षकांनी निवडले नाही… एकही संघ गुणवत्तेस लायक नाही…असा निकाल देऊन अगदी योग्यच करून एक नाट्य पीढी वाचवली….यातुन नाट्य रंगकर्मी नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्त्या संस्थां…बोध घ्यावा आणि आपला दर्जा सुधारण्यासाठी उपाय योजना आणि प्रयत्न करावा……परिक्षकांचे मनःपूर्वक आभार…!!!
……..निश्चितच दर्जाहिन कलाकृतीची वाहवा आणि पाठराखण न करणारे प्रेक्षक रसिक श्रोते अजूनही टिकून आहेत कलेच्या प्रांतात परंतु एखाद्या कलाकृतीचं कलेचं योग्य मुल्यांकन करणारे योग्य परिक्षकच काही अंशी पाहावयास मिळत नाहीत.दिवसेंदिवस परिक्षकांतही प्रगल्भता यायला पाहिजे.. पुर्वी आमच्या काळी अभ्यासपूर्ण संशोधक परिक्षक असत ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील निम्मी अधिक हयात ही कला जोपासण्यासाठी जपण्यासाठी, संवर्धनास खर्ची घातलेली असायची…असे परिक्षक योग्य तो निकाल देऊन टिकाऊ सादरीकरण करणाऱ्यांना पुढील संधीस पात्र ठरवत… आजकाल टाकाऊआणी विकाऊ परिक्षक (सर्वच नाहीत…)आणि हीन कलाकृती मुळे कलेचा दर्जा घसरत आहे….
मात्र आजही चोखंदळ, दर्जेदार,अभ्यासु रसिक प्रेक्षक कलेचं अगदी योग्य काटेकोरपणे निरीक्षण करून योग्य जागी दाद देतात आणि आपली रसिकता दाखवतात…!
साहजिकच ज्या कॉलेज चा इव्हेंट त्या कॉलेजमधील मुलांचा गृप आपल्या इव्हेंट ला प्रोत्साहन देण्यासाठी येईलच ना…! आणि स्वतः च्या कॉलेज गृपच्या इव्हेंटला तो उत्स्फूर्तपणे दाद देईलचना…! मग ती कला ,परफार्म दर्जेदार आहे चांगला झाला की नाही सादरीकरण दर्जेदार आहे की नाही हे तो पाहणार नाही फक्त आपल्या कॉलेजचा परफॉर्मन्स आहे म्हणून तो दात खाऊन आणि शिट्या टाळ्या पिटवुन दाद देऊन कलाकारांना खोटी सहानुभूती दाखवत एक प्रकारे फसवणूकच करतो…. कधी कधी काही परीक्षकही त्यांच्या त्या उत्स्फूर्त पणास बळी पडून प्रेक्षक प्रतिसाद उत्तम म्हणून मार्कांची खैरात करतात आणि दर्जा हिन कलाकृतीस बक्षीसं जातात… तेव्हा खऱ्याखुऱ्या मेहनती कलावंतांचा भ्रमनिरास होतो..कधीकधी त्यांचा कलेवर भरोसा राहत नाही व एवढं छान देऊन ही आपणास डावलल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसते…त्याचा उत्साह विरुन जातो…तर काही जिद्दीने तयारीला लागतात. पुढील वर्षी बक्षिसांच्या अपेक्षेने बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात पण कधी कधी पुन्हा त्यांना परीक्षकांच्या अज्ञानाचा (मॅनेज)फटका बसतो….
कधी कधी या बेगडी निष्ठेने कलावंत हि घडत नाही…. साहजिकच आहे पि.एच.डी.झालेल्यांना खुप समजतं असा गैरसमज बऱ्याच जानत्या लोकांचा असतो… नावापुढे नावालाच डॉ.लागलेले अनेक डॉन्की त्यांनाच ज्ञान शिकवतात, ज्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी त्यांचीच मदत घेऊन आपले थेअसिस(प्रबंध), रिसर्च पेपर्स पुर्ण केलेले असतात…अशा लोकांच्या कलाकृतीचं परिक्षण करण्यास आणि त्यांच्या चुका काढण्यास सज्ज होतात…नव्हे काय योग्य काय आयोग्य…त्यानाच शिकवतात…..अशा नकली लोकांना एक दोन नाटकात रोल करून एवढं दिव्यज्ञान प्राप्त होतं असं वाटतं आणि प्रशासन किंवा कार्यक्रम आयोजक त्यांना परिक्षक म्हणून बोलावतात.दर्जाहिन परिक्षकांमुळे कलेचा ,(अकलेचा ही) दर्जा ढासळत आहे….कारण परीपुर्ण ज्ञान नसणाऱ्या परिक्षकांकडुन पास होऊन.. हुषार, अनुभवी, अभ्यासु…परिक्षका समोर कलेची परिक्षा देण्यासाठी कलावंत येतो तेव्हा वशिल्याच्या कलावंतांना आपली किंमत कळते…. आणि पुरूषोत्तम करंडक सारखे निर्णय अभ्यासु परिक्षकांना घ्यावे लागतात…. आणि कुठलाही संघ गुणवत्ता प्राप्त होत नाही… खुप बरं केलं अगदी रास्त निर्णय परिक्षकांनी घेतला…खोटे कलावंत निर्मिती थांबली तरी किमान या वर्षासाठी तरी….
चुकीच्या संस्कृतीचं वळण नवोदित कलाकारांमधे जात आहे.. प्रबोधन परिवर्तनाच्या वाटा आडुन देवभोळ्या गोष्टी कडे कलावंत जात आहे… वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठीचं भान बाजूला ठेवून लोककलांचा अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा बाजारू बाज दाखवण्यात कलावंत दंग आहे.कारण त्यांना (कलाकारांना) मार्गदर्शन करणाऱ्यांना डॉ (डॉ न्किंना)क्टरांना किती अक्कल असते,ते त्यांच्या छचोर परिक्षणांमधुन निरीक्षणांतुन कळून येते… दिसून येते.काटेकोरपणे प्रशिक्षण व्हायला पाहिजे.परीक्षनांवर निरीक्षण करणारा कोणीतरी पाहिजे,नाहीतर नकली चिकित्सकांमुळे नकली कलाकारांची फौज निर्माण होईल आणि अखंड कला नकली होण्यास उशीर लागणार नाही….
लोककला जतन आणि संवर्धन करण्याच्या नावाखाली अंधश्रद्धा फोफावण्याचं काम आपण करत आहोत असं कधी कधी काही कलाकृतीतून निरीक्षणावरून दिसुन येते.परंतू लोककलेचा फक्त पारंपरिक बाज वापरून परिवर्तन वादी विचार त्या कलेतून दिसला तर त्या लोककलेचा प्रसार जनसामान्यांपर्यंत पोहोचत प्रबोधन होईल असे मला वाटते….
शिक्षणाचं, आरोग्य, कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, गर्भलिंगनिदान, वृक्षारोपण,जातीवाद समुळ नष्ट करण्यासाठी, एकात्मता आणि अखंडता टीकवण्यासाठी, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव,एक गाव एक पाणवठा, अनेक नागरी सोयी-सुविधा समस्यांचे निर्मुलनासाठी आपण लोककलेचं माध्यमातून जनतेपर्यंत पोहचु शकतो, शाहिरी जलसे,शिव भिम शाहीरी जलसे, सत्यशोधक जलसे तमाशा कलेचं सुधारीत केलेलं अंग… लोकनाट्य,अभिनय,स्कीट, प्रहसन विनोदी अभिनय यातून दाखवलेली सामाजिक, राजकीय दांभिकता दाखवण्यात आली पाहिजे.बेरोजगारी, महागाई भ्रष्टाचारावर हसतहसत वार करून नाकर्ते सरकार बेजबाबदार प्रशासक यांना उघडं पाडणारं लिखाण आपल्या लिखाणातून करून शासनाला प्रशासनाला ताळ्यावर आणणारं पोषक लिखाण नवोदितांना करता आलं पाहिजे… तसं मार्गदर्शन प्रस्थापित लेखक, साहित्य समजणाऱ्यांनी नवोदितांना केलं पाहिजे… छोटेखानी लिखाण शिबीर आयोजित करून नविन लिहिणाऱ्याना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे… कविंच्या बाबतीत ही अगदी असंच… काही नवनवीन कविच्या रचना खुप प्रगल्भ आणि वैचारिक दृष्टिकोन असणाऱ्या आहेत या सर्व बाबींचा विचार करून नवोदितांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे परंतु हे आपल्या पुढे जातील आणि आपला इतिहास पुसेल असल्या हिन भावनेने ते नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध होऊ देत नाहीत संधी देत नाही… मिळाली तर साधं प्रोत्साहनही देत नाहीत… आणि प्रसिद्धीही…..
प्रस्थापित कविंनी जो बाजार मांडला आहे त्यात नवोदित कवींची मंडी झाली आहे… सगळ्या गोष्टी पुरक असुन त्यांना प्रोत्साहनाचं बळ न देणे हे ठरवून खच्चीकरण करण्याचं गचाळ राजकारण प्रस्थापित कवी,लेखक,खोटे साहित्यिक, थोड्या हळकुंडाने पिवळे झालेले काही (सर्वच नाही) कलावंत, युट्यूब सिनेमा सुपरस्टार इत्यादी आदींनी नवोदित आणि प्रतिभावंतांचीअगदी गुजरी करुन टाकली….
या बेंटेक्स साहीत्यीक, लेखक,कवी,विचारवंतांमुळे बावन्न कशी अस्सल सोन्यासारखी विचारवंत पुतळे होऊन बसले आहेत… स्वतःची विटंबना करुन घेत…
मराठी साहित्य खुप व्यापक आहे आणि त्यात कलेचं मोठं योगदान आहे.. वादन,गायन,नाट्य,नृत्य,संगीत, लोककला,चित्रपट,भाव,अभिनय अनेक रसांधी निर्मिती करुन सुखमय जीवन घडवण्याचं काम आणि ज्ञान साहित्यातून आपण मिळवू शकतो… आणि इतरांनाही देऊ शकतो… नुसते मनोरंजन आणि बक्षीसांच्या हव्यासापोटी चुकिने केलेल्या एखाद्या कलाकृतीची नव्या पिढीला चुकीची माहिती जाईल आणि पुढे ते लोण पुढच्या पिढीला जाईल… पुढं पुढं चुकिच्या स्वरुपात सरकत जाईल.. ओघानं चुका दुरुस्त न केल्याने पुढील पिढी तोच आदर्श समजून तशीच चुकिची माहिती अंगीकृत करून कलेस विकृत बनवण्यास जबाबदार घडेल..पडेल..
चार मैफिली ऐकुन… एखाद्या स्पर्धा गाजवून गायन करून स्टेजवर जाण्याची ची घाई नवोदितांना असते.साधना,मेहनत शिकण्याच्या जिद्दीपेक्षा सहा महिन्यांत रियालिटी शोमध्ये दिसण्याची घाई असते….
खरं तर सिनेमा कसा पहावा याचं जसं शिक्षण एफ.टी.आय.मधे असतं…तसं रसिक श्रोत्यांना एखादा कार्यक्रम,संगीताची शास्त्रीय बैठक,नाटक,कसं पाहावं यांचंही प्रशिक्षण मिळण्याची कार्यशाळा असायला पाहिजे… म्हणजे कलावंता सोबत रसिक श्रोते ही तयार होतील.(वैयक्तिक पातळीवर काय पाहायचं, ऐकायचं ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे म्हणा…पण तरीही)
पण तो काळ वेगळा होता… पुर्वी आम्ही विद्यार्थी दशेत असताना …जिवतोड मेहनत करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी कलावंत आणि त्यांना शिकवणारे प्राध्यापक आणि बाहेरून खास बोलावलेले प्रशिक्षक, वादक यांचा ताळमेळ एखाद्याच महाविद्यालयात दिसायचा… एखाद्या कलाकृतीची नक्कल करण्या पेक्षा त्या कलेचा अभ्यास मुळासह करुन काहीशा का होईना पण चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याची धडपड असायची.. ऐकून घेण्याची क्षमता कुवत असायची… आणि शिकण्याची धडपड उत्साह पाहून ती पुर्ण करण्याच्या हेतूने प्रशिक्षक तितकीच धडपड करत.मेहनितीच्या मानानं मेहनताना खुप कमी असायचा पण तरीही भरभरुन परिपूर्ण देण्याचं काम प्रशिक्षक करत हे मात्र सत्य…
लावणी शिकणाऱ्या साठी प्रत्यक्ष रात्री लावणी थिएटरमध्ये कलावंतांना वेशांतर करून ती कला दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचं धाडस त्यावेळी आम्ही करत होतो आणि कलावंत(खास करून मुलगी)
त्यांना प्रतिसाद देत होते…एक जिद्द होती म्हणून.. वासुदेव पात्र करणाऱ्यास चार-पाच दिवस वासुदेवा सोबत फिरून त्याचं गाणं, गाण्याची ढब,त्याचा ढंग,त्याचा पारंपरिक वेशभूषेतील वावर हे सर्व काहीशा प्रमाणात आत्मसात आणि आंगीकारण्यास त्याला वासुदेवा सोबत फिरवत होतो किंवा वासुदेवास कॉलेज मध्ये आणून वासुदेव असा असतो..वेश,गणवेश, झोळी, चिपळ्या,टाळ,माळ,मोरमुकुट इ.दाखवत होतो…तर लोकनाट्याचा गृप बाजार, जत्रा तील येणाऱ्या तमाशास आठवणीन घेऊन जात असुत.. जेणे करून त्या कलाकारांच्या लकबी,हजर जबाबीपणा स्टेजवरील वावर.. हँडप्रोपर्टीचा वापर..टीपेचा आवाज आत्मसात करण्यासाठी पाहण्यासाठी घेऊन जात असत.. तेव्हा कुठे त्या कलाप्रकाराची मुलांना माहिती मिळे…. काही मुले खेड्यात राहणारे असत… त्यांचाही फायदा भारूड,भजना,सारख्या प्रकारात होत असे…
एखादं नाटक (एकांकिका) हे ज्वलंत विषयावर सादर होत असताना लेखक लेखनही तसेच अभ्यासपूर्ण लिहीत असे…त्यास दिग्दर्शक ही कसे दर्जेदार होईल हे पाहुनच ते बसवत असे.. त्याला लिखाणास पुरक साहित्य पुरवण्याचं काम संबंधित प्राध्यापक करत असत… आणि मार्गदर्शन ही…. गोंधळ,भारूड,पोवाडे इत्यादी वर्षभर निरीक्षण करून अभ्यास करून बसवत असत… आता त्या-त्या क्षेत्रात डॉक्टर कि (संगीत, नृत्य, नाट्य, लोककला) असणारे प्राध्यापक काही नावालाच… कुठल्याही गोष्टीचा गंध नसणारे ही… आणि काही पुस्तकी डॉक्टरकी मिळवणारे झाले.ते आता विद्यार्थ्यांना तितकंच मार्गदर्शन करतात जितकी जुजबी माहिती त्यांनी ऐकुन लिहून घेतलेली असते, आणि हळुहळू ती ‘ध’ चा ‘मा’ होतहोत पसरत वेगळ्या वळणावर जाते…तीच परंपरा आहे असा चुकिचा संदेश पसरत राहतो…तिच परंपरा नवोदितांच्या अंगात भिनवली जाते मनात बींबवली जाते, परंतु त्या परंपरेचा आधार घेऊन काही नवप्रबोधक विचार बोध देण्याचं विसरून विभत्सतेचं जास्त दर्शन घडवुन भडकपणे सादरीकरण करुन जुन्या परंपरांचे चुकिच्या, आणि घान विकृत प्रकारे सादरीकरण करून त्यांना बदनाम करण्याचं, त्यांच्याकडे हिनपणे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करतात.. त्याकरिता चुकीचे मार्गदर्शक न नेमता चिकीत्सक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शक परिक्षकांची नेमणुक करणे हितावह ठरेल आणि कलेच्या प्रांतात विकास होऊन प्रतिभावान कलावंत कसे घडतील या कडे लक्ष देणे गरजेचे आहे
*लोक कलेचे निकष आणि आकस….*
अनेक लोककला लोप पावत चाललेल्या आहेत….त्या सर्वांना कारणी भुत अर्ध्या हाळकुंडात पिवळे होणारे कलावंत… आणि एक दोन परफोर्म करणारे नकली अभ्यासक नृत्य दिग्दर्शक….लावणीचं परीक्षण कशानुसार कोणते निकषांवर करावं संगीत, नाट्य (मुद्रा अभिनय) नृत्य (पद्ण्यास) रंगभुषा वेशभूषा…. नजाकत,विषय, लावणीतील पारंपरिक भाव सामाजिक मुल्य …. लावणीचा बाज तालबद्धता…. शब्द आणि गायनाचा ढंग,रस,विषयानुसार आवाज ढब ,… समय काल प्रांतानुरुप परीस्थिती अनुरूप मांडणी… इत्यादी मुद्देसुद परीमान निरीक्षण…
गायीका, वादक, आणि नृत्यांगना आणि या (तीनही घटकांवर) तिघांना समयसूचकता ठेवून प्रेक्षकांच्या मनातलं गुपित ओळखत मनकवडेपण जपत केलेलं सादरीकरण…. ती खरी अस्सल सुसंस्कृत मराठमोळा लावणी….
नर्तक पुरुष असो वा स्री हल्ली लावणीचं वेड दोघांमध्ये दिसुन येते…. लावणी स्पर्धेपुर्ते सादरीकरणापुर्ते गेटअप ठीक आहे परंतु सादरीकरणानंतर काही महाभाग उगाचंच मीरवत राहतात…यात मात्र प्रामुख्याने नर्तक पुरुषाचे प्रमाण जास्त असतं…. आणि ते आपल्या चालण्यातुन हावभावातुन बोलण्यातुन लावणीचं किती पावित्र्य जपतात ते बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते…घाणेरडं प्रदर्शन करत लावणी अपीवत्र करण्याचं काम ते करतात…. लावणी सादर करणाऱ्या नर्तक नर्तकींना लावणी कितपत समजते… तिचे शब्द, भाव, विषय आणि रस ताल… हेही पाहणे गरजेचे आहे .. ते लगेच दिसून येतं… संगीतातले बारकावे नृत्य पद्ण्यासातुन दिसून येते… पुर्वांगात लावणीची सुरुवात तोडा गायनाची सुरवातीची गती, तालाची लय विसंगती, मध्य विस्तार …ठाई … विलंबित… अंत्य विस्तारा आधी विषयपुर्ती… भाव पद्ण्यास छटा , गती वक्री चक्री आंदोलन तिहाई घटीका आणि समाप्ती…. या पद्धतीत लावणीचा रंग भरत जातो
लावण्य हे चिरकाल टिकणारे असते त्यामुळे शाहीरांना रचना करण्यात कधी कमतरता भासणार नाही परंतु तरीही बरेचशे कवी,लावणी प्रकाराकडे वळत नाही का ते कळत नाही… विरपुरुषांचे गुणगान असणारी कवनं आणि पोवाडे गाणारे जास्त आहेत पण लिहीणारे कमी आहेत पुर्वी लिहिलेल्या अनेक पोवाडे आज बरेचशे शाहीर गात आहे… देशभक्ती, आईवडिलांची सेवा, कधीमधी भारुड, मधेच लोकगीते असा गोंधळ करत बरेचजण कार्यक्रम पुर्ण करतात… रामावर, कृष्णावर पोवाडे गाणारे ही बरेच शाहीर उदयास येऊ लागले, जिवंत माणसांवर देखील पोवाडे गाऊन भाटगीरी करत कॉपीड शाहीर डफ घेऊन सर्वत्र मीरवत आहेत…. महाराष्ट्राचा इतिहास पुरता माहिती नसणारे गायकीच्या जोरावर किर्तनातुन आणि रामकथेतुन कोणी भागवत कथेतुन पोवाडे गाऊन वेळ मारून पोवाडा सारख्या स्वतंत्र कला प्रकारात घुसखोरी करून आम्हाला हेही येत असं दाखवु लागले पोवाड्या सारख्या कलेचा रसभंग करु लागले आहेत जुन्या पिढीतील श्रोते रसिक प्रेक्षक मायबापाना पोवाडे माहिती आहेत परंतु नव्या पीढीला चुकीची माहिती पोहचत आहे आणि विररस युक्त पोवाडा कलेचा पाववडा होऊ लागला… पारंपारीकतेला सुरूंग लावण्याचे काम नवीन लावणी लिहीणाऱ्या कविंनी शाहीरांनी करून घरंदाज लावनी ऍटम साँग मध्ये बंदिस्त करून ठेवली आहे…. चवली पावली वर जपलेलं पावित्र्य नोटाबंडल खोक्यात धुळीस मीळवलं… लावणी ही रडते, कव्वाली तडफडतेय, गझल मात्र तिच्या घोषात आहे भक्तीगीतांवर सिनेमा गीतांनी अतिक्रमण केलं.. भावगीतांचा भाव लोकगीतानी ओढला.. जागरण गोंधळान त्यांचा पोत सोडला… मुरळ्या राहिल्या नाहीत जागरणात नाचणाऱ्या कोत्यांनीच लंगर तोडला.. कोणी कोणाशी संबंध जोडु लागले किर्तनात भजनं जास्त चालु लागले… थोडासा राहीला महाराजाला आवाज… लगेच होतो सुरु पखवाज… फक्त शिल्लक आहे पंचपदी … ती बी लागली पिक्चरच्या चालिच्या नादी… सुरू केला गण की म्हणतात झाली सुरू भण भण.. ऐकण्यापेक्षा पाहायला छान वाटते गवळण.. नाच पाहून म्हणतात होऊदे लावणी… दुःख वाटते भैरवी ची सुरु होते विनवणी
गणीतीय सुत्र आखुन परखुन लावणी लिहीणारे शाहीर खऱ्या अर्थाने परीक्षणास पात्र असावेत…. लावणी शिकवताना तिनही घटकांचा समावेश करून जो शिकवतो तो खरा गुरू…. कारण नुसती आदा शिकवूण लावणी परीपुर्ण होत नाही किंवा पदण्यास शिकवूण किंवा ताल शिकवूण लावणी परीपुर्ण होत नसते… तिनही गोष्टी सोबत लावनीतील शब्दांचा अर्थबोध स्थल काल समय रस बोधासह ताल आणि मात्रा यांचं गणित समजून सांगनं ही महत्वाचे आहे… नुसते अती मेकअप थापुन किळसवाण्या अदाकारी आणि नुसतं धांगडधिंगा करत नाचणं म्हणजे लावणी नाही… तीचं पारंपरिक पावित्र्य जपत ताल सुर, अदा सोबत रस, काल, गती या सर्व मुद्यांना जपुन अभ्यासपूर्ण लावणी असावी… काव्याच्या योग्य व्याकरणाच्या पद्धतीने लिहिलेल्या रूपकास योग्य तालात बसवत नृत्याच्या माध्यमातून तालबद्ध ठेक्याच्या गणीतात गायणास आडव्या न येणाऱ्या मात्रांच्या समतोल राखत नृत्यांगणाच्या सौंदर्य आणि चपलता पुर्वक अदाकारी आणि योग्य वेशभूषा केशभूषा आणि नजाकतीने केले नृत्य तीनही निकषात नाट्य नृत्य संगीत,अदा,गायन आणि वादन, यात सर्वस्वी ताऊन सुलाखून निघाल्या नंतर अस्सल पारंपरिक घरंदाज पावित्र्य लावणी… …या सर्व बाबींचा अभ्यास असणारे नर्तक आणि अभ्यासू परीक्षक देखील असायला पाहिजेत… ज्यांना तिहाई म्हणजे काय हे माहिती नसणाऱ्या नर्तक किंवा नर्तकीचा क्रमांक फक्त शिष्य म्हणून पहिला काढणं म्हणजे अन्याय आहे… स्वतः परीपुर्ण असलं म्हणजे आपले विद्यार्थी तेवढ्या परीपुर्ण पणे कसोटीत ऊतरतीलच असं नाही… कारण खोटे खऱ्या स्पर्धेत अर्धेच राहतील…. आणि खऱ्या मेहनत करणाऱ्यांवर अन्याय होईल… परीक्षण करताना वैयक्तिक हेवेदावे अथवा पुर्वगृहदुषीत हेतू मनात ठेवून आपण परीक्षण करत असाल तर आपण खूप मोठं पातक करत आहात… आपण असं करुन खुप भुषण मिरवत असाल पण ते अगदी कर्तव्य शुन्य बाब आहे..लोककला लोकसंस्कृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या खात्या मार्फत सुरू असताना… लोककला जिवंत राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे लोककलेचे महामेळावे परिसंवाद, विविध संमेलनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबवत शासकीय तमाशा प्रशिक्षण शिबीर, लावणी महोत्सव, लावणी नृत्य शिबीर,शाहीरी शिबीरं ,भारूड महोत्सव असे विविध प्रकल्प योजना शासन राबवत असताना शाळा महाविद्यालय स्तरावर गाव खेड्यांच्या लोककला सादर होऊन त्या राष्ट्रीय स्तरावर सादर होण्यासाठी प्रयत्न सक्तीने करायला पाहिजे परंतु खुप खंत व्यक्त करावीशी वाटते… खरं तर हा महोत्सव ऐच्छिक आहे ही सुचना वाचल्यावर लोककला संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न आहे की हळुवार लोककला संपुष्टात आणायच्या आहेत हा उदात्त हेतू स्पष्ट होईना… लोककला संवर्धनासाठी शासन विविध पुरस्कार जाहीर करत आहे मेळावे संमेलनं भरवत आहे… आणि आपण ह्या विषयाला ऐच्छिक करून मर्यादित करत आहात असं मला एक लोककलावंत आणि लोककला अभ्यासक या नात्याने वैयक्तिक वाटते…

लेखक कवि गीतकार शाहीर विलास सोनवणे (लोककलावंत, लोककला संशोधक /लोककलावंत अनुदान छाननी सदस्य मुंबई महाराष्ट्र राज्य) लोककलावंत लोककला अभ्यासक असुन शाहीर आणि पुरातन लोकनृत्य,लोकसंगीत संशोधक आहेत ९०११७३३९९४



