७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अंबाजोगाई वकील संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अध्यक्ष ॲड. अजित लोमटे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम
अंबाजोगाई: वकिली व्यवसायातील ताणतणाव दूर करून मनोरंजनाचे क्षण अनुभवण्यासाठी अंबाजोगाई वकील संघाच्या ७४ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात प्रथमच भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष अजित लोमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे संमेलन ११ ते १७ जानेवारी दरम्यान विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले.
या स्नेहसंमेलनाची सुरुवात ११ जानेवारी २०२६ रोजी क्रिकेट सामन्याने झाली. जिल्हा न्यायाधीश भस्मे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, लुडो यांसारख्या खेळांसोबतच रांगोळी, संगीत खुर्ची आणि चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये वकील बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
१७ जानेवारी २०२६ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने या स्नेहसंमेलनाचा समारोप झाला. या दिवशी वकील सदस्यांसाठी काव्यवाचन, गीतगायन आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश भस्मे, न्यायाधीश डॉक्टर तेहरा, ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजीराव कराड आणि ज्येष्ठ विधीज्ञ सुधाकरराव चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजित लोमटे, उपाध्यक्ष ॲड. दिलीप गोरे, सचिव ॲड. रविकांत सापते, सहसचिव ॲड. बळीराम पुरी आणि ग्रंथपाल शोएब यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन ॲड. पुष्पा धायगुडे, ॲड. स्नेहल नागरगोजे आणि ॲड. बळीराम पुरी यांनी केले. या कार्यक्रमात वकील संघाचे सर्व सदस्य, सर्व न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी हिरिरीने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक सिद्धेश्वर स्वामी आणि वकील संघाच्या कार्यकारिणीने मोलाचे सहकार्य केले. ७४ वर्षांची परंपरा मोडीत काढून सुरू झालेल्या या नवीन उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



