*ज्ञानाचा उ:षकाल घडविणा-या : आदरणीय सौ.उषाताई किरण गित्ते*
( मा.सौ.उषाताई किरण गित्ते मॅडमचा 27 डिसेंबर 2025 रोजी वाढदिवस.त्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्राचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.)
मानवी जीवनात काळाचा महिमा अगाध आहे.तीन प्रकारचे काळ सांगितले गेले आहेत.भुतकाळ,भविष्यकाळ व वर्तमानकाळ.या काळात ही दिवस रात्र येते.दिवस म्हणजेच कार्यप्रवणता प्रकाशाचे आगमन बारा तास सहवास तर रात्र म्हणजे विश्रांती व अंधाराचे साम्राज्य.अंधाराला भेदुन प्रकाशाचे स्वागत प्रारंभी ज्या अवस्थेत होते त्यालाच उषकाल म्हटले गेले आहे.हा उषकाल अंधाराचे साम्राज्य संपले असून प्रकाशाचे,मांगल्याचे आगमन होत आहे.याची सूचना देते.म्हणुन उषा या स्थितीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.त्याच उषा या नावाप्रमाणे अज्ञान,अविवेक,अविकास या अंधाराला नाहीसे करून ज्ञानाचा ,विवेकाचा,विकासाची उषा म्हणजेच उषाताई गित्ते मॅडम होत.त्यात जर ज्ञान किरण साथीला असल्यास माऊली म्हणतात तसे
अविवेकाची काजळी l फेडूनी विवेक दिप उजळी l योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ही स्थिती निर्माण होते.उषाताईंच्या सोबतीला किरण हे पती लाभले आणि दुग्ध शर्करा योग जुळुन आला आहे.यामुळे विकास घडताना दिसतो.विकास घडवणारे मग ती स्त्री असो की पुरुष. केवळ दृष्टी असून चालत नाही तर दूरदृष्टी असणे गरजेचे असते.माणसाचा सर्वांगीण विकास हा केवळ शिक्षणामुळेच होऊ शकतो हे अनेक महापुरुषांनी सांगितले यात प्रामुख्याने महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.याचा अनुभव आपण मागील काही वर्षांपासून समाजात पाहतो आहोत व घेतो आहोत.हाच वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून अज्ञान,अंधकार दूर करून ज्ञानाचा उषकालीन किरणाचे प्रकटीकरण करण्याचे काम जे काही मोजके लोक करतात त्यात आवर्जून मा. उषाताई किरण गित्ते ताई साहेबांचा व किरण गित्ते साहेबांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शैक्षणिक कार्यरंभ केला.त्यांच्या घरातच मुळात वडील शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक वातावरण आधीपासूनच होते. त्या शिक्षकाच्या कन्या होत.त्यांचे वडील म्हणजे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू असे दिनकररावजी मुंडे गुरुजी हे होत.दिनकरराव गुरुजींच्या संस्कारात व पती किरण गित्ते साहेब यांच्या सहवासात असल्यामुळे त्यांनी सर्वाधिक महत्त्व शिक्षणाला दिले आहे.अलीकडे आपण पाहतो की माणसे भौतिक सुविधांच्या मागे लागले आहेत. विशेषता अधिकाऱ्यांच्या पत्नी तर भौतिक सुविधा जोडण्यातच अग्रेसर दिसतात.घरात सोफासेट, डिनर सेट,टी सेट असते पण माईंड मात्र अपसेट आसते असे चित्र सर्रास आज आपण पाहतो आहोत. खऱ्या अर्थाने हे अपसेट माईंड सेट करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय ते होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना चांगले शिक्षण व संस्कार देणे महत्त्वाचे आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा मुलमंत्र ‘शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे व जो कोणी प्राशन करील तो वाघा सारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे लक्षात घेऊनच ताईंनी परळी शहरात विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली आहे. या माध्यमातून काळाची पावले ओळखून त्यांनी किरण गित्ते IAS अकॅडमी , दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ, पोद्दार जंबो किड्स , दिल्ली वर्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड स्कूल परळी वैजनाथ सुरू केली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे.इंग्रजी भाषा हे जगाचे ज्ञान करून घेणारे प्रवेशद्वार आहे.जगाला जाणून घेण्याची महत्त्वाची खिडकी आहे.ती बंद असून चालणार नाही किंवा यापासून अनभिज्ञ राहूनही चालणार नाही.ही बाब लक्षात घेऊन ती उघडण्याचे काम या माध्यमातून त्यांनी केले आहे.खरे तर दिनकरराव गुरुजी व किरण गित्ते साहेबांसारखे सर्वज्ञ त्यांच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून असल्यामुळे ताईंना हे काम करणे सोपे गेले.एका आय.ए.एस.च्या पत्नीने भौतिक सुविधांच्या मागे न लागता समाजातील उपेक्षितांच्या शिक्षणासाठी धडपड करणे हे लाखो लोकांतील एक असामान्य असे उदाहरण आहे.परळी या शहराची ओळख राजकीय दृष्टीने अधिक आहे. त्यानंतर तीर्थक्षेत्र, औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वे स्थानक म्हणून व भागात असलेले कीर्तनकार यामुळे ही परळी चर्चेत असते.शैक्षणिक ओळख परळीला म्हणावी तशी लाभलेली नाही. ही शैक्षणिक ओळख या कार्यातून देण्याचे काम ताईसाहेब करताना दिसतात.आपले पती किती अडचणीतून शिकून अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण अभ्यास करून जीवनात यशस्वी झाले हे त्यांनी याची देही याची डोळा पाहिले आहे.शिक्षणामुळे एखादं पद प्राप्त केल्यावर माणसाला कशी सर्वार्थाने प्रतिष्ठा मिळते याचा अनुभवही त्यांनी घेतला असल्यामुळे बहुजनांच्या मुलांच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे गरजेचे हे लक्षात घेऊन त्यांनी परळीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. अलीकडच्या काळात ‘मी आणि माझे’ अशी प्रवृत्ती बळावत असताना तसेच आपल्यापेक्षा मोठा कोणी होऊ नये जर कोणी झाला तर अस्वस्थ वाटणाच्या या काळात समाजातील अनेक मुले उच्च पदावर जावेत व ती आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ही भावना ज्या स्त्रीच्या ठिकाणी आहे तिला दुरदृष्टी लाभलेली स्त्रीच म्हणावे लागेल.या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचा फायदा घेवुन अनेक जण एम.पी.एस.सी. च्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहेत. आतापर्यंत दोनशेहुन अधिक जणांनी यश प्राप्त केले आहे.त्यांनी स्वतः या स्पर्धा परीक्षा देऊन त्याचा अनुभव घेतला आहे.त्यांनी ठरवले असते तर त्या एखाद्या अधिकारी पदावर जाऊ शकल्या असत्या पण पतीच्या कार्याला खंबीर साथ देणे,अनेक विद्यार्थी घडवणे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या कार्य करताना दिसताहेत.त्यांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची स्थापना करून एक शैक्षणिक क्रांती घडविली आहे.आज इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अवघ्या काही वर्षातच या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याला कुशल नेतृत्व देण्याचे काम ताईसाहेब करताहेत. या शाळेचे उद्घाटनच मुळात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डी.वाय.पाटील यांच्या हस्ते करून एका अर्थाने यशाकडे जाण्याचे पहिले पाऊल उचलले गेले होते.या शाळेतील नियोजन,अभ्यासू शिक्षक, त्यापेक्षा त्यांच्याकडे असलेली नम्रता, विविध नीतीमुल्य रुजवण्यासाठी शाळेत घेण्यात येणारे अनेक उपक्रम. हे वाखणण्याजोगे आहे.
केवळ शैक्षणिक कार्यापुरत्याच त्या मर्यादित नाहीत तर विविध धार्मिक कार्यात ही त्या अग्रेसर असतात.विविध कीर्तनकारांची कीर्तन आयोजित करणे,कीर्तन श्रवण करणे,महाप्रसांदांचे आयोजन करणे.त्रिपुरा राज्याचे आराध्य दैवत असलेल्या देवीची भक्ति त्या करतात.तीच्या भक्तांच्या सूख सूविधा व भौतिक विकासात पती बरोबर कार्य असी विविध धार्मिक कार्य ही त्या करतात.
सामाजिक कार्यात रंजल्या गांजल्यांना मदत करणे,संकटकाळी धावुन जाणे,सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणे हे ही वाखणण्याजोगे आहे.
खरे तर ताईसाहेबांचे काम समाजाला विशेषत: स्त्री वर्गाला प्रेरणा देणारे आहे.अस्या व्यक्तिमत्वाची दखल राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणुन निवडूण करायला हवी.त्यांना विविध क्षेत्रातुन जे बारा आमदार घ्यायचे असतात त्यात अस्या व्यक्तिमत्वाला संधी दिली तर त्याचे सोने होवु शकते.मला खात्री आहे की भविष्यात असा विचार होईल.
कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या यशात एका स्त्रीचे महत्त्वाचे योगदान असते.मग ती स्त्री पत्नी,आई अथवा बहीण या अन्य कोणत्याही नात्याची असो.खरे तर माणसाच्या जीवनाला आकार देण्यात आई इतकेच महत्त्वाचे स्थान पत्नीचे असते. किरण गित्ते साहेब त्रिपुरा राज्याचे नगरविकास, महिला बालकल्याण,आरोग्य,वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान,पर्यटन विभाग सचिव म्हणून आज काम करताहेत या पुर्वी ही त्यांनी वेळोवेळी अन्य जिल्हाधिकारी अमरावती,पुणे महानगर आयुक्त पदावर उत्कृष्टपणे कार्य केले आहे. त्यात ताईंचा सिंहाचा वाटा आहे.अशा शिक्षणावरती अफाट प्रेम करणाऱ्या,आपल्या पतीला यशस्वीतेकडे घेऊन जाणाऱ्या, आपल्या पित्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या,परळीत शैक्षणिक क्रांती करू पाहणाऱ्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा उषकाल घडविणा-या उषाताईंचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.ईश्वर त्यांचे आयू आरोग्य अबाधित राखो व त्यांच्या कडून भविष्यात ही असेच कार्य घडत राहो.असी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझा शब्द प्रपंच थांबवतो.
प्रा.डॉ. रामकृष्ण बदने ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर,
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५


