ग्रामीण भागातून घडतेय गुणवत्ता : रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूरचे मराठवाडा विभागीय स्पर्धेत घवघवीत यश
बर्दापूर | प्रतिनिधी
बीड येथील समर्थ लॉन्स येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच सहभागात उल्लेखनीय यश संपादन करत मराठवाड्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वेगवान गणनाशक्ती, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. अशा स्पर्धेत ग्रामीण भागातून सहभागी झालेल्या रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोठ्या शहरांतील नामांकित केंद्रांनाही मागे टाकले. त्यामुळे ग्रामीण भागातूनही दर्जेदार गुणवत्ता घडू शकते, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.
रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूर हे केंद्र अल्पावधीतच गुणवत्तेचे प्रतीक ठरले आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती यामुळे हे यश मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले. अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होत असून गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो, हे या यशातून स्पष्ट झाले आहे.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी अवघड गणिती उदाहरणे अत्यंत कमी वेळेत आणि अचूकरीत्या सोडवून परीक्षक मंडळाला प्रभावित केले. त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक परीक्षकांकडून करण्यात आले.
या उल्लेखनीय यशानंतर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गिरीश करडे, मणियार तसेच मास्टर ट्रेनर तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी, गोल्ड मेडल्स व अबॅकसची मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूरच्या संचालिका संध्याराणी जाधव आणि शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांसाठी नियमित सराव, मानसिक तयारी व स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे पालकांनी सांगितले.
या यशामुळे रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूरला यंदा उत्कृष्ट केंद्र हा मान मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे या केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे बर्दापूर व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
स्पर्धेत रुद्रम जाधव, ईश्वरी भोसले, अपेक्षा सूर्यवंशी यांनी ट्रॉफी जिंकत विशेष यश संपादन केले. तर किशोरी सिरसाठ, कुणाल सिरसाठ, स्वरूप कांबळे, शाहनवाज देशमुख यांनी गोल्ड मेडल मिळवून केंद्राच्या यशात मोलाची भर घातली.
या यशामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही मोठा वाटा असून त्यांनी मुलांच्या नियमित सरावासाठी वेळ दिल्याचे नमूद करण्यात आले. स्पर्धा व सत्कार सोहळ्यावेळी प्रेमला भोसले, श्रीदेवी सिरसाठ, किशोर भोसले, परमेश्वर सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली.
सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूरचे मुख्याध्यापक मधुकर जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे यश अभिमानास्पद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची गुणवत्ता याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सरस्वती शाळेचे संस्था अध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी ग्रामीण भागातून घडणारी गुणवत्ता प्रेरणादायी असल्याचे सांगत रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकसने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. श्री रेणुक प्राथमिक शाळा, बर्दापूरचे मुख्याध्यापक रमेश सिनगारे तसेच विवेक ज्ञान मंदिर, बर्दापूरचे मुख्याध्यापक चंद्रकांत इगवे यांनीही या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना व संस्थेला शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय पातळीवरही हे विद्यार्थी यशाचा झेंडा फडकावतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


