अंबाजोगाई

Spread the love

*कृषि महाविद्यालयात ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळाव्याचे’ कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन*

*_”माणसाचे वर्तन कसे असावे, बिकट परिस्थितीला सामोरे कसे जावे हे बळीराजा कडून शिकावे”- डॉ.राजेश इंगोले यांचे मौलिक भाष्य_*

*विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे करावा – सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे*

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे नुकतेच १८ सप्टेंबर रोजी, शैक्षणिक वर्ष – २०२५-२६ नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमांची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्ज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणि, वनामकृविचे संचालक शिक्षण, डॉ.भगवान आसेवार, अंबाजोगाई येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सुप्रसिद्ध व्याख्याता व मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या उद्घाटनीय मार्गदर्शन पर भाषणात कुलगुरू डॉ.इंद्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कारही अंगीकारले पाहिजेत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष करायला शिकले पाहिजे. आपण आपल्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग सेवाभावी वृत्तीने शेतकरी आणि समाजासाठी केला पाहिजे. संचालक शिक्षण डॉ.भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रातील सुधारणा, कृषि क्षेत्राचा विकास हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होय. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे केला पाहिजे. समाजामध्ये हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे आपण व आपले कुटुंबीय अडचणीत येऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी हा घटक केंद्रीभूत ठेवून महाविद्यालयांनी आपली भूमिका निभावली पाहिजे. ज्ञानसंपन्न आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडले तर देशही घडत असतो. तेव्हा विद्यार्थ्यांनीही अभ्यासू आणि चिंतनशील वृत्ती अंगीकारली पाहिजे. प्रमुख व्याख्याता म्हणून बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. ते म्हणाले की, दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी या त्रिसुत्रीच्या बळावर यशाचं शिखर गाठता येते. संघर्ष हाच यशाचा खरा पाया आहे. संघर्षातून मिळालेले यश हे चिरकालीन टिकणारे असते. यावेळी डॉ.इंगोले यांनी आपल्या खुमासदार शैलीत जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये माणसाचे वर्तन कसे असावे, बिकट परिस्थितीला सामोरे कसे जावे, परीक्षेमध्ये यश कसे मिळवावे, अभ्यासात सातत्य कसे, मोबाईलचे व्यसन कसे सोडावे व माणसे कशी जोडावी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी अभिलाषा खोडके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!