डिजीटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा एस.एम.देशमुख यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी शुक्रवारी घेतला.
छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक जवळील संत एकनाथ नाट्य मंदिरात दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सुरुवात होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार परिषदेची छत्रपती संभाजीनगर शाखा प्रयत्नशील आहे.
प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल मीडियानेही सध्या माध्यम क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांसाठी डिजिटल मीडियाच्या रूपाने इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी व्यासपीठ स्थापन केले आहे.
डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने पहिल्यांदाच राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगरात आयोजित केले आहे. अधिवेशनाच्या या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे आधारस्तंभ श्री.एस.एम.देशमुख हे छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी आले होते.
एस.एम.देशमुख यांच्यासोबत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी, प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाठ, डिजिटल मीडियाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर मुळे या मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी एस.एम.देशमुख यांचे स्वागत परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा सरचिटणीस प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, कोषाध्यक्ष महादेव जामनिक यांनी परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी, प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट, विश्वंभर मुळे या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी एस.एम.देशमुख यांनी संत एकनाथ नाट्यमंदिर व परिसराची पाहणी करून अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले.
