राजकिशोर मोदी यांच्याकडून शेख सद्दाम व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान,,,!
*जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा अंबाजोगाई स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश*
*संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्याकडून शेख सद्दाम व त्याच्या कुटुंबाचा सन्मान*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शेख सद्दाम अलीम याने सन २०२५ च्या NEET परीक्षेत ५०८ गुण मिळवून अंबाजोगाई येथीलच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला आहे. शेख सद्दाम याच्या यशाबद्दल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या वतीने सद्दाम व त्याच्या कुटुंबाचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सद्दाम व त्याची आई , जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विनायक मुंजे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद ताहेर तसेच श्री योगेश्वरी पतसंस्थेचे संचालक जावेद गवळी हे उपस्थित होते.
शेख सद्दाम अलीम याचे ११ वि १२ चे शिक्षण हे जोधाप्रसादजी मोदी महाविद्यालयातच झाले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती व आर्थिक संकटाचा सामना करत सद्दाम याने आपले शिक्षण केले आहे. त्याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याचा आईने धुनी भांडी व मोलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळत सद्दाम याला शिकवले आहे. बारावीनंतर सद्दामने लातूर येथे खाजगी क्लासेस करून आपला अभ्यास पूर्ण केला. लातूर येथे शिक्षण घेण्यासाठी त्याला मंगळवार पेठ परिसरतीलच जमील सर, नईम सर, डॉ लतीफ तसेच एसआयओ संस्थेने अर्थसहाय्य केले. सद्दाम याने देखील आपल्या कौटुंबिक परीस्थितीची तसेच इतरांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवत आपले ध्येय निर्धारित करून अभ्यास पूर्ण केला व आज त्याच्याच परिश्रमाचे फळ त्याला अंबाजोगाई येथेच स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना सद्दाम याने आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय हे आपली आई आणि गुरुजनांना दिले आहे. वेळोवेळी केलेल्या शाळेतील गुरुजनांच्या यथोचित मार्गदर्शन व सहकार्यामुळेच आपण इथपर्यंत पोचू शकलो अशी भावना सद्दाम याने याप्रसंगी व्यक्त केली.
राजकिशोर मोदी यांनी सद्दाम याचे तोंडभरून कौतुक करत त्याचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाण ठेवत मनात जिद्द बाळगून अभ्यास केला तर कोणतीही अशक्य अशी गोष्ट सहजपणे शक्य होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच शेख सद्दाम होय असे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. सद्दाम यास त्याच्या पुढील शिक्षणासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे सदैव तत्पर राहील असे अभिवचन देखील याप्रसंगी सद्दाम व त्याच्या कुटुंबियास दिले. या कौतुक सोहळ्याप्रसंगी जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
