अण्णाभाऊंनी उपेक्षितांची वेदना आपल्या साहित्यातून मांडली : डॉ. राजेश इंगोले
*
महात्मा फुले स्मारक समितीकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी*
अण्णा भाऊंनी उपेक्षितांची वेदना साहित्यातून मांडली – डॉ.राजेश इंगोले*
अण्णा भाऊंचे जीवनचरित्र प्रेरणादायी – भागवत मसने*
- ======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महात्मा फुले स्मारक समिती, अंबाजोगाईच्या वतीने थोर समाजसुधारक, क्रांतीशील विचारवंत आणि लोककवी अण्णा भाऊ साठे यांना १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले स्मारक समिती, अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भागवत मसने, प्रा.अनंत कांबळे यांच्यासह समितीच्या कार्यकारी विभागाचे अध्यक्ष बी.के मसने आणि सचिव रत्नदीप गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विचारवंत डॉ.किरण चक्रे यांनी केले. प्रमुख व्याख्याते बी.आर.मसने यांनी याप्रसंगी अण्णा भाऊ साठे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास, अण्णा भाऊंचा विषयी जीवनपट उलगडला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अण्णा भाऊ आपल्या साहित्याशी, कार्याशी एकरूप झाले. अतिशय विदारक परिस्थिती असताना अण्णा भाऊ भाऊंनी जागतिक दर्जाचे साहित्य विश्व् निर्माण केले. अण्णा भाऊंनी जे जगले, जे अनुभवले त्याचे चित्रण त्यांनी आपल्या साहित्यात उतरविले. फकिराला अण्णा भाऊंनी अतिशय समर्थपणे आपल्या कलाकृतीतून मांडले. फकिरामधून अण्णा भाऊंनी क्रांतीची मशाल पेटवली व त्यामुळे एक लढाऊ नायक जन्माला आला. विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करण्याची ताकद अण्णा भाऊंनी आपल्या दमदार साहित्यातून निर्माण केली. त्यांच्या साहित्याचे रसग्रहण आणि सामाजिक भाष्य हे सर्वांसाठी आजही मार्गदर्शक आहे असे मसने यांनी सांगितले. तर प्रा.अनंत कांबळे यांनी आपल्या भाषणात अभ्यासपूर्ण विवेचन केले. संत तुकाराम यांच्यानंतर १९ व्या शतकात विद्रोही साहित्यकार अण्णा भाऊ हे जन्माला आले असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात विविध कथा, कादंबऱ्या यांचा संदर्भ देऊन आंबेडकरवादी अण्णा भाऊ उपस्थितांसमोर प्रभाविपणे मांडले. यावेळी समाजातील विविध घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्मारक समितीच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी डॉ.अनिल नरसिंगे आणि सुनिल नरसिंगे यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच बीव्हीएससी (पशुवैद्यकीय) अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल कु.स्नेहा संजय साळवे हिचा व तिचे वडील समितीचे कोषाध्यक्ष संजय साळवे व आई यांचा ही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी शाळा न शिकता ही दर्जेदार साहित्य निर्मिती करता येते हे अण्णा भाऊंनी जगाला दाखवून दिले अशा मार्मिक शब्दांत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र उलगडवून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिल नरसिंगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.मिलिंद ढगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी कलेढले सर, राजू साळवे, आदित्य कदम, गोविंद जोगदंड, राजकुमार ठोके आणि प्रमोद सोनवणे तसेच यावेळी सुभाषराव ताटे, रामेश्वर खाडे, गणेश कदम, सोमेश्वर जाधव, भाऊराव गवळी, कैलास आडे, प्रा.सोमनाथ किरवले, विजय वल्लमवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
