अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान
अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील क्रांतिकारक लेखक होते. त्यांनी कथा कादंबऱ्या लोकनाट्य कविता पोवाडे या विविध साहित्य प्रकारातून दलित समाजाच्या व्यथा मांडल्या आणि समाज प्रबोधन केले. अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणून श्रेय दिली जाते. त्यांची साहित्य म्हणजे शोषितांचे साहित्य असे म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत लेखक आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक होते, ते एक क्रांतिकारी वादळ होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ चा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते.
दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या 19 कथा संग्रह 14 लोकनाट्य 11 पोवाडे एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, गाणी लिहिली आहेत. मराठी साहित्याला” क्रांतीचा ऊर्जा स्त्रोत” देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरीचीत आहेत. “माणूस” हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे. माणसाचे माणूसपण जपणारा साहित्यिक सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचे नावलौकिक आहे त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग आणि धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे त्यांचे साहित्य वैचारिक असून त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि संशोधक वृत्तीची धार आहे. बहुजन चळवळीचे नायक आहेत, अण्णाभाऊ ‘दलित कथेचे शिल्पकार,’आहेत. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. साहित्य सोबतच समाजाची सेवा करणारे अण्णाभाऊ कृतिशील साहित्यिक होते. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. ‘फकीरा ‘ या कादंबरीला इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी फकीरामध्ये आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारी पासून वाचवण्यासाठी ग्रामीण रुढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणारा नायक फकीराला चित्रीत केले आहे.
त्यांचे साहित्य हे सामाजिक शोषण, अन्याय आणि गरीब श्रमिक,दलित वर्गाच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील दुर्बल वर्गाचे दुःख, संघर्ष आणि त्यांचा आत्मसन्मान अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. आपल्या कादंबऱ्यांमधून सामाजिक संघर्ष,वर्ग विवेक श्रमिकाचे जीवन स्त्रियांचे शोषण जातीभेद हे विषय प्रमुख आहेत. बालपणीच गरिबीमुळे शिक्षण थांबले पण समाजाची जाणीव, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, आणि कला यांच्या जोरावर त्यांनी आपले स्थान साहित्यकला आणि समाज सुधारण्याच्या क्षेत्रात निर्माण केल. अण्णाभाऊ साठे हे तमाशा आणि लोक कलेचे उत्कृष्ट जाणकार होते त्यांनी लोकनाट्य या माध्यमाचा प्रभावी वापर करून समाज प्रबोधन केले. त्यांच्या लोकनाट्य मधून श्रमिक वर्गाचे जीवन,स्त्री शोषण, व्यसनाधीनता जातीयता यावर टोकदार टीका आढळते. ‘गडीमेला पण वाडा राहिला,’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले लोकनाट्य आहे. अण्णाभाऊ साठे यांनी सुमारे 100 हुन अधिक कथा लिहिल्या त्यांच्या कथांमध्ये वास्तववादी थेट आणि समाजभिमुख दृष्टिकोन आढळतो. त्यांच्या कथांना समाज परिवर्तनाचे धार आहे. अण्णाभाऊ साठे यांचे आणि क्रांतिकारक पोवाडे आणि जनजागृती पर कविता आजही लोकांच्या ओठावर आहेत. त्यांच्या साहित्याने दलित चळवळ श्रमिक चळवळ आणि सामाजिक समतेच्या आंदोलनांना बळ दिले. त्यांनी साहित्याला लोक जीवनाशी जोडले आणि त्यातून संघर्षशील साहित्य निर्मिती केली. अण्णाभाऊ साठे हे’ सोवियत युनियन’ ला भेट देणारे पहिले मराठी लेखक होते.
अण्णाभाऊ साठे यांनी दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. त्यांचे साहित्य बंडक्रांती आणि विद्रोहाची विचार शलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्वज्ञान आहे. “ही पृथ्वी शिष्याच्या मस्तकावर धरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे” अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. माझा रशियाचा प्रवास मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली. अण्णाभाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा ह्रदयस्पर्शी आहे. दुःख देण्या आणि दारिद्र्याच्या साखळी दंडात सापडूनही अण्णांनी विपुल असे साहित्य संपदा निर्माण केली त्यांचे साहित्य भारतासह रशिया. झेक, पोलंड,जर्मनी अशा 27 भाषेत भाषांतरित झाले. त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अतिशय वेदनादायी आहे. साम्यवादी विचारांनी अण्णाभाऊ भारावलेले होते. त्यांनी मार्क्सवादी चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी माणसे जोडली. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे अशी अपेक्षा त्यांना नेहमीच होती.
अशा या महान साहित्यकाचा मुंबईतील चिराग नगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत 18 जुलै 1969 रोजी मृत्यू झाला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे फक्त वाचनाचे साधन नसून संघर्षाचे आणि परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्यांनी मराठी साहित्याला एक नवीन दिशा दिली त्यांच्या लेखणीमुळे दलित शोषित वंचित वर्गाला आवाज मिळाला आज आजही त्यांचे साहित्य प्रेरणादायी आहे आणि सामाजिक समतेच्या लढ्यात मार्गदर्शक आहे.
लेखिका
वैशाली चव्हाण (यादव )8329445276
लातूर.
