बीड

मांडेखेलच्या दीपक व्हावळेचा बीडच्या पोलीस भरती दरम्यान दुर्दैवी मृत्यू,,,!!

Spread the love

मांडेखेलच्या दीपक व्हावळेचा बीडच्या पोलीस भरती दरम्यान दुर्दैवी मृत्यू,,,!!

       बीड / (प्रतिनिधी)

 बीड येथील पोलीस भरती दरम्यान,परळी तालुक्यातील मांडेखेलच्या दीपक व्हावळे याच्यावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे. ऊसतोड मजूर कुटुंबातील या युवकाचे ऐन पोलीस भरती मैदानावरच भरती प्रक्रियेत असताना निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान बुधवारी दुपारी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर व्हावळे (रा. मांडेखेल.ता. परळी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता. भरतीदरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डीहायड्रेशनचा त्रास होत असल्याचे तपासणीदरम्यान सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच दीपकचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलीस यंत्रणेने तातडीने दीपकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दीपकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हृदयविकाराचा तीव्र धक्का त्याला बसला की अन्य काही कारण आहे, याची स्पष्टता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच मांडेखेल येथे झालेले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या य युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक संवेदना व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!