भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळाले खमके नेतृत्व,,,!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळाले खमके नेतृत्व!
मरहूम अतहर बाबर साहेबांची धमक दिसावी
बीड प्रतिनिधी – बीड शहर बचाव मंचचे संस्थापक श्री. नितिनजी जायभाये यांनी राजकारणात प्रवेश केला असून त्यांच्या रूपात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खमके नेतृत्व मिळाले आहे.
बीड शहराची दयनीय अवस्था ही तशी काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकी असो, की खासदारकी किंवा नगराध्यक्ष ही सर्व पदे वर्षानुवर्षांपासून ठराविक राजकीय व्यक्तींच्या हातात किंवा त्यांच्या कुटुंबाच्या हातात आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पदांवर असलेल्या व्यक्तींना बीड शहर आणि जिल्ह्यात मिळायला हवे तसे विरोधक मिळालेच नाही. यामुळे बीड शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात विकासाची पार रया गेली आहे. ही बाब लक्षात घेता काही काळापूर्वी सर्वसामान्यातून नितीन जायभाय नामक एक तरुण पुढे आला आणि त्याने ज्येष्ठांसह तरुणांना सोबत घेत बीड शहर बचाव मंचची स्थापना केली. या मंचाच्या माध्यमातून या तरुणाने उचललेल्या अनेक प्रश्नांद्वारे राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतच राजकारण्यांच्या हातचे बाहुले झालेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा घाम फोडला आहे. मात्र फक्त बीड शहरच नाही तर संपूर्ण राज्य आणि देशात एक अशी अघोषित प्रथा सुरू झाली आहे की, चांगले सामाजिक कार्य करायचे असेल तर फक्त संघटना किंवा संस्था करून चालत नाही तर त्याला राजकीय पाठबळ ही लागते परंतु हे पाठबळ घेताना हेही लक्षात घ्यावे लागते की, पाठबळ देणारा पक्ष, नेता किंवा पदसिद्ध राजकीय व्यक्ती हा भ्रष्ट नसावा. नाहीतर सामाजिक कार्यास अर्थ राहत नाही. म्हणून नितीन जायभाय या तरुणाने आळीपाळीने सत्ताधारी झालेल्या किंवा सत्ता उपभोगलेल्या राजकीय पक्षांच्या वडचणीला न जाता काही वर्षांपूर्वी पर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नेहमी हाबुक ठोकणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या तरुण नेतृत्वाच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला माजी नगराध्यक्ष, भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आणि आदरणीय नेतृत्व म्हणून आजही जनतेच्या स्मरणात असलेले मरहूम कॉम्रेड अतहर बाबर यांच्यानंतर खरे खमके नेतृत्व मिळाले आहे. आता या तरुण नेतृत्वाच्या खमकेपणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष पक्षासाठी, शहरासाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी कसा उपयोग करून घेतो तसेच नितीन जायभाय हे कॉम्रेड म्हणून यापुढे कसे काम करतात याकडे बीड शहरासह जिल्हावासियांचे लक्ष राहणार आहे.
*मरहूम अतहर बाबर साहेबांची धमक दिसावी*
श्री. नितिनजी जायभाये यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश घेऊन कॉम्रेड झाल्याचे जाहीर होताच त्यांच्याकडून मरहूम अतहर बाबर साहेबांसारखी कणखरता, भ्रष्टाचाराला थारा न देणारे नेतृत्व, चुकीच्या राजकीय व्यक्तीला सळो की पळो करून सोडणारे कार्य, जनतेसाठी नेहमी रस्त्यावर उतरून कार्य करण्याचा बाणा अंगी बाळगावा लागेल. अर्थातच त्यांच्यात मरहूम कॉम्रेड अतहर बाबर साहेबांची धमक दिसावी अशी बीडवासियांना अपेक्षा राहणार आहे.
*श्री. नितिनजी जायभाये मुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मरगळ दूर होईल?*
मरहूम कॉम्रेड अतहर बाबर साहेब यांच्या निधनानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला फक्त बीड शहरच नाही तर जिल्हाभरात घरघर लागली. त्यांच्या पश्चात या पक्षाकडे आजपर्यंत ही त्यांच्यासारखे खमके नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. अतहर बाबर साहेबांसारखा करारी बाणा, कणखरता, आक्रमकता, मानवता, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून कार्य करण्याची धमक आजपर्यंत ही या पक्षात असलेले नेतृत्व दाखवू शकले नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व गेल्या अनेक वर्षांपासून जणू संपले होते. परंतु नितीन जायभाय सारख्या नव्या दमाच्या व आक्रमक तरुणाच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मरगळ दूर होईल का? असा प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होत असून श्री. नितिनजी जायभाये आपले अस्तित्व दाखवून देताना कसे कार्य करतात? याकडे जनतेचे लक्ष राहणार आहे.
बीड शहर बचाव मंचचे संस्थापक नितीन जायभाय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करण्या अगोदरच मंचच्या सदस्या, नामांकित लेखिका तथा समाजसेविका असलेल्या रूपाली देशपांडे यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. शिवाय मंच मध्ये आम आदमी पक्षाचेही अनेक पदाधिकारी सक्रिय आहेत. यामुळे बीड शहर बचाव मंच एक असला तरी त्यात असलेले सदस्य मात्र अनेक पक्षीय विचारधारा असलेले आहेत हे विशेष.
