*डिजिटल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी भरत निगडे यांची निवड*
पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी भरत निगडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पुणे येथील परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भरत निगडे यांची नियुक्ती करत पुणे जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारणी लवकरच जाहीर करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
मंगळवारी (दि.२) पुणे येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. १४ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार येण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,संघटक सुनील वाळुंज,पुणे महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद गव्हाणे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
डिजिटल मिडिया परिषदेचे पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न १७ पत्रकार संघातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या युवकांनीही या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यांतून १०० हुन अधिक पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहतील असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
